मुंबई
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केलेल्या वक्तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया देत गुजराती कंपनी असेल तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, अँटिलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात काय करता? असा सवाल उपस्थित केला.
यावेळी पुढे ते म्हणाले, रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटत होते. मात्र कालच्या समिटमध्ये अंबानींनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि पुढेही राहिल, असं स्पष्टच सांगितलं आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर महाराष्ट्रात का आलात? मराठी माणसाने दिलेल्या जमिनीवर उद्योग करत आहात ना?
संदीप देशपांडेंनी यावेळी मराठी माणसाला आवाहन केलं आहे. यापुढे रिलायन्सची वस्तू खरेदी करताना ती भारतीय कंपनीची नाही तर गुजराती कंपनीची आहे हे लक्षात ठेवायला हवं. अंबानींचा उद्देश जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात त्यांचं काम काय?
पंतप्रधान देशाचे की गुजरातचे?
मुकेश अंबानींनी हे वक्तव्य केलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनीही काही आक्षेप घेतला नाही, खरं पाहता पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे असा प्रश्न उपस्थित होतो.