जालना
विधिमंडळात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केलं असलं तरीही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असून यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं आणि सगेसोयऱ्याची अंमलवजावणी करावी या मागण्यांवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात वेगळं १० टक्के आरक्षण देऊ केलं आहे. मात्र ५० टक्क्यांच्या पुढे गेलेलं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नसल्याची शक्यता असल्याने राज्य सरकारच्या निर्णयावर मराठा समाजाकडून आक्षेप नोंदवला जात आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले..
हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी काम करतो आहे. त्यांच्यासाठीच लढत राहणार, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले.