मुंबई
आज विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात १० टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र ५० टक्क्यांच्या वर गेलेलं हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र याचा कितपत फायदा होईल? मराठा समाजाने जागरूक राहायला हवं, कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
याआधी तामिळनाडूत राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं. मात्र आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मूळात राज्य सरकारला असे अधिकार आहेत का? ही बाब केंद्राची आणि सर्वोच्च न्यायालयत सुरू असलेल्या निर्णयाची आहे. हा विषय तांत्रिक आहे. त्यामुळे उगाच सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्याचं कारण नाही, असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.
राज्य सरकार म्हणतंय १० टक्के आरक्षण दिलं. परंतू तुम्हाला याचे अधिकार आहेत का? २०१८ मध्येही फडणवीस सरकारच्या काळात कायदा लागू करण्यात आला होता, त्याचं पुढे काय झालं? देशात अनेक राज्यं आहे. राज्याराज्यांमध्येही अनेक जाती आहेत. त्यांचेही विषय आहेत. असं एखाद्या राज्याबाबत किंवा जातीबाबत असं करता येत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी समाजाला जागरूक राहण्याचा सल्ला दिला.