नवी मुंबई
मराठा आरक्षणाच्या लढाईला अखेर यश आलं असून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने मध्यरात्री याबाबतच बैठक घेऊन पहाटे अध्यादेश काढला असून तो जरांगे पाटलांकडे पाठवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. याशिवाय समाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला, त्यांनी चांगलं काम केलं, असंही पाटील यावेळी म्हणाले.
- कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे.
- सरकारने सगेसोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला आहे.
- राज्यातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याची राज्य सरकारची तयारी
- वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.
- विधानसभेत यावर कायदा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान राज्य सरकारने सर्व कागदपत्रे मनोज जरांगे यांना दिली असून त्यांनी उपोषण सोडावे अशी विनंती मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मनोज जरांगेंनी खूप मोठी लढाई आपल्या समाजासाठी लढली, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आले आहे. आज नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.