कल्याण- राज्यात महायुतीत अद्याप मनसेचा समावेश झाला नसला तरी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात महायुतीचे नेते आणि मनसे एकत्र आलेले पाहायला मिळाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसे आमदार राजू पाटील हे आपल्या सोबत असल्याचं वक्तव्य केल्यानं, अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर खासदार श्रीकांत शिंदेही मनसे आमदारांशी बोलताना दिसले. त्यामुळे मनसे महायुतीत होणार का, या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात दहिसर मोरी गावात रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील हे तिन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 14 कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आला, या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या गावांमध्ये होत असलेली विकास कामे आणि या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्याबद्दल कार्यक्रमात खासदार शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मनसेशी युतीचे रवींद्र चव्हाणांचे संकेत
रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना महायुतीच्या माध्यमातून विकास कामं सुरू असल्याचं सांगतानाच, राजू पाटील आमच्या सोबत आहेत. असं विधान केलं. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर मतदारसंघात तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा दावा रवींद्र चव्हाणांनी भाषणात केला. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसे आमदार काय म्हणाले ?
तर मनसे आमदर राजू पाटील यांनी सुद्धा मंत्री रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं. चव्हाण मंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त आनंद आपल्याला झाला, हक्काचा माणूस मंत्री पदावर बसल्याचं समाधान आपल्याला मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमानंतर मनसे महायुतीत आहे का, अशी विचारणा केली असता वरिष्ठ पातळीवरचा निर्णय राज ठाकरे घेतील असं आमदार राजू पाटील म्हणालेत. मात्र स्अथानिक पातळीवर भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि मनसे विकासासाठी एकत्र अ्सल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यातही संवाद रंगलेला पाहायला मिळाला. त्यामुळे येत्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि मनसे एकत्र येणार का, अशी चर्चा पुन्हा रंगलीय.
हेही वाचाःसगेसोयरे अध्यादेशावर आचारसंहितेपूर्वी शिक्कामोर्तब?, जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश?