मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Graduate Constituency) रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी ‘सशर्त’ पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून निरंजन डावखरे (Niranjan Davkhare )निवडणूक लढणार आहेत . दरम्यान या निवडणुकीतून माघार घेण्यामागे राज ठाकरे यांचे दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा नितीन सरदेसाई यांनी केला आहे .
आज सकाळी निरंजन डावखरे ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यानंतर त्यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. तसेच ठाकरे मनसेच्या फायद्याचा विचार करूनच निर्णय घेतात , राजकारणात बऱ्याच गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने दिसत असतो. असा दावा नितीन सरदेसाई यांनी केला. त्यामुळे मनसेचा यावेळीचा पाठिंबा हा ‘बिनशर्त’ नसून ‘सशर्त’ असल्याचे स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातून लढण्याची सर्व तयारी मनसेने केली होती. पण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा पक्षाला काय फायदा होईल, हे तुम्हाला नजीकच्या काळात कळेलच. विधानसभा निवडणुकीत इतरांना पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही. अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले .
दरम्यान दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीतील नेतृत्वास भेट दिली. दिल्लीतील भाजपचे हायकंमाडच फडणवीस यांचा फैसला करणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.