मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत .
काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. परंतु अधिकृत घोषणा केली नव्हती .आज भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव आहे. दरम्यान या यादीत नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जागेचे नाव अजून नाही. भाजपच्या यादीत पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे त्यात आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आता १८ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता. भाजपकडून बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले .या सातारा मतदारघात उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळही ठोकला होता. आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात आता कोणाचं पारडं जड जाणार यावर सध्या साताऱ्यात चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान महायुतीत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी या निवडणुकीसाठी सातारा आणि माढा मतदारसंघांवर दावा केला होता. मात्र माढा मतदारसंघाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अगोदर जाहीर करण्यात आली. साताऱ्याची जागा अजित पवार गटाने हक्काने मागून घेतली आहे. त्यांचा उमेदवार तयार असतानाही उदयनराजे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली होती . अजित पवार गटा कडून उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले. मात्र उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आणि आज त्यांच्या नांवावर उमेदवारी जाहीर झाली . दरम्यान काल मविआच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज तुतारीचा नाद आणि ताशाचा कडकडाट अशा जल्लोषी वातावरणात , मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात आला .