महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी CID चौकशीचे अभाविपकडून स्वागत

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी CID चौकशीबाबत पत्रकार परिषद घेताना अभाविपचे पदाधिकारी

निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी; संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठातील टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याच्या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ही चौकशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि मुंबई विद्यापीठाच्या लागू नियमांनुसार निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय करण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

पेपरफुटीप्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपच्या मुंबई महानगर शाखेतर्फे २० एप्रिलपासून सातत्याने आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली CID चौकशीची मागणी अखेर मान्य झाली आहे. २७ जुलै रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.

विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविपने उभारलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचा हा महत्त्वपूर्ण विजय असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मात्र, चौकशीच्या अटी आणि कार्यकक्षा निश्चित करण्याचे अधिकार कुलगुरूंना देण्यात आल्याने चौकशी प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे आवश्यक असल्याचे अभाविपने स्पष्ट केले. चौकशी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप, पक्षपात किंवा दबाव यापासून मुक्त असावी, अशी संघटनेची भूमिका आहे.

या प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला संरक्षण मिळू नये, कोणतीही माहिती दडपली जाऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या प्रत्येक दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, असेही संघटनेने म्हटले आहे.

पेपरफुटी हे केवळ प्रशासकीय अपयश नसून विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि विद्यापीठाची विश्वासार्हता यांच्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे अभाविपने नमूद केले. त्यामुळे चौकशी वेळेत आणि कायद्याच्या चौकटीत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत चौकशी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार, महानगर सहमंत्री समीर हरजानी, शशिकांत चौहान, अलका यादव आणि कोकण प्रांत मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात