मुंबई : मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली.
अमित देशमुख म्हणाले की, नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे प्रकल्प हा दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या गेल्या अनेक दशकांपासूनच्या अपेक्षांचा विषय आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी या रेल्वेमार्गाची मागणी प्रथम मांडली होती. त्यानंतर विविध लोकप्रतिनिधींनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आहे.
ते म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समसमान आर्थिक वाटा उचलण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सुमारे ₹३,००० कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आपला निधी देण्यास तयार आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप आर्थिक हिस्सा उपलब्ध झालेला नाही.
राज्य सरकारने आपला वाटा तातडीने मंजूर केल्यास हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल आणि नांदेड, लातूर तसेच मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे अमित देशमुख यांनी सभागृहात स्पष्ट केले.

