नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी २०२३ मध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यातही शरद पवार गट विरोधी पक्षात तर अजित पवार गट सत्ताधारी पक्षात शिंदे गट आणि भाजपसोबत सामील झाला आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुतांश आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला, आणि चिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोगाचा निकाल आज किंवा या आठवड्यात येण्याची शक्यता वकील सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्ष दोन गटात फुटल्यानंतर धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आणि उद्धव ठाकरे गटाला पक्षाचं नावही बदलावं लागलं आणि मशाल हे चिन्ह घ्यावं लागलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याला विरोध केला. त्यांनी एक आठवड्याची मुदत द्यावी असं म्हटलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालय अखेर दोन आठवड्यांची मुदत देण्यास तयार झाले.