मुंबई
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ अंतर्गत ही सुनावणी घेण्यात येणार आहे. अजित पवार गटाने स्वत:हून पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
शिदें आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणातील निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना राज्यभरातून टीकेला सामोरं जावं लागलं. भरत गोगावलेंचा व्हिप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांकडून देण्यात आला. आता राष्ट्रवादीच्या प्रकरणात अजित पवारांच्या दिशेने कौल दिला जाणार की, आणखी दुसऱ्या पर्यायाचा अवलंब करणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
 
								 
                                 
                         
                            
