मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत (Locall Body Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण महाराष्ट्रात आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध केली असून, थेट ३८ नगराध्यक्ष आणि जवळपास ११०० नगरसेवक घड्याळ या अधिकृत चिन्हावर निवडून आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केली.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्यभरात पक्षाने ३,६८१ जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले होते, त्यापैकी १,०९० नगरसेवक थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चिन्हावर विजयी झाले. “हा आकडा फक्त आकडेवारी नाही, तर ग्रामीण मतदारांचा स्पष्ट कौल आहे,” असे ते म्हणाले.
या निकालांतून राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील स्ट्राईक रेट शहरी भागाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या चांगला राहिल्याचे स्पष्ट होत असल्याचे तटकरे म्हणाले. स्थानिक आघाडी, विकास आघाडी अशा विविध प्रयोगांमधूनही राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. हे नगरसेवक अधिकृत आकडेवारीत धरले नसले, तरी राजकीय वास्तव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव यापेक्षा मोठा असल्याचा दावा त्यांनी केला.
या निवडणुकांत काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढत दिली, तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष–राष्ट्रवादी (BJP-NCP alliance) आणि राष्ट्रवादी–शिवसेना (NCP-Shiv Sena alliance) अशी युती झाली. या सर्व ठिकाणी महायुतीला (Mahyuti) मिळालेला प्रतिसाद पाहता, काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासाठी हा निकाल राजकीय धोक्याचा इशारा आहे, असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel), तसेच मंत्रिमंडळातील सहकारी आणि स्टार प्रचारकांनी प्रभावी प्रचार केल्याचा उल्लेख करत, तटकरे यांनी “ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे” असे स्पष्ट केले. नऊ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने जनतेत नाराजी होती, मात्र मतदानातून जनतेने सहभाग घेतला, हे लोकशाहीसाठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“नगरपरिषद निकाल हे केवळ ट्रेलर आहेत,” असा सूचक इशारा देत, तटकरे यांनी सांगितले की आता महानगरपालिका निवडणुका (Muncipal Corporation elections), तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी (ZP – PS elections) राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र आणि युतीस्तरावर रणनीती आखत आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, सुरज चव्हाण आणि लतिफ तांबोळी उपस्थित होते.