Twitter : @milindmane70
मुंबई
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या, असे केलेले वक्तव्य त्यांचे नसून हा भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे सिद्ध झाले आहे.
पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तसेच वेळ पडल्यास ढाब्यावर जेवायला घेऊन जा या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. असे असले तरी बावनकुळे यांचे ते वैयक्तिक मत नसून भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे एका प्राप्त झालेल्या लेखी पुराव्यावरून सिद्ध होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खालील स्वरूपातील अजेंडा भाजपाने आपापल्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रसिद्ध केला आहे.
(1) सोशल मीडिया टीम
डिसेंबर अखेरपर्यंत लोकसभा, विधानसभा स्तरावर सोशल मीडिया हँडल सुरू करणे.
बूथ स्तरावर व्हाट्सअप ग्रुप तयार करणे, या ग्रुपला सातत्याने कंटेंट पुरवणे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राजकीय प्रचाराचे मुद्दे तयार करणे, सोशल मीडिया कार्यशाळा आयोजित करणे,
(2) मीडिया टीम
पत्रकारांबरोबर दुपारचे किंवा रात्रीचे जेवण ठेवून नियमित संवाद करणे.
पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाची माहिती सर्व चॅनल, वृत्तपत्रांना दिली जात आहे ना, याची खातरजमा करणे.
केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यांना सर्व पत्रकार उपस्थित राहतील याकडे लक्ष देणे.
पक्षाचे कार्यक्रम जनतेपर्यंत नेण्यासाठी नियमित पत्रकार परिषद घेणे.
(3) लीगल टीम
ज्या राज्यात आपले सरकार नसेल, तेथे सत्तारूढ पक्षाकडून भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची प्रकरणे सातत्याने चर्चेत ठेवणे
अशा हल्ल्यांबाबत जनहित याचिका दाखल करणे, काही प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणे.
विरोधकांच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आरटीआयचा वापर करणे.
(4) लाभार्थी संपर्क टीम
पंतप्रधान गरीब कल्याण योजना, किसान सन्मान निधी, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, स्वनिधी, जलजीवन मिशन यांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे.
या लाभार्थ्यांबरोबर नियमित संपर्क करणे.
लाभार्थ्यांचे शिबिर व अन्य कार्यक्रम आयोजित करणे.
अशाप्रकारे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा अजेंडा तयार केला असून या अजेंडानुसारच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.