बीड
बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे यांनी हजेरी दर्शवली.
आमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे गोपीनाथ गड आणि भगवान गडावर उपस्थित राहिल्या. विशेष म्हणजे सत्ताबदलानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे सर्वांसोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याचा आरोप पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून केला जातो. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता हा आरोप केला जात असला तरी यामागे कोण याबाबत नेहमीच कुजबूज रंगत असते. दरम्यान आजच्या कार्यक्रमानिमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मुख्यमंत्र्यासह एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला आणि भगवान गडावर अभिवादन केले.
पंकजा मुंडेसाठी मतदारसंघ सोडेन – डॉ. रत्नाकर गुट्टे
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पंकजा मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार असल्याचे डॉ. गुट्टे म्हणाले. गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. माझ्याविषयी भाजप पदाधिकाऱ्यांकडून अपप्रचार केला जात असून जर पंकजा मुंडेंना गंगाखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी मी मतदारसंघ सोडण्यास तयार आहे.