मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली आहे . त्यांच्या या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. त्यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला होता. आपण दावा केल्यानंतरही भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे( Amol Ramsing Kolhe )यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या साथीने लोकसभा लढवणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे . कारण राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे भाजपमधला सोलापुरातला (solapur ) मोठा नेता उद्या शरद पवार गटाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवताना दिसला तर जास्त आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता या घडामोडी पाहता भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे . दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाची लवकरच लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर होईल. यामध्ये माढ्याबाबत आपली वेट अँड वॉचची भूमिका आहे. तसेच राज्यात जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान या मतदारसंघातून रणजितसिंह यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar )यांचाही विरोध आहे. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी गेल्या आठवड्यात अकलूज येथे दाखल झाले होते. गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मोहिते पाटलांच्या समर्थकांनी गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मोहिते पाटील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आता अमोल कोल्हेचा भेटीनंतर ते काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .