मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या आरोप प्रत्यारोपदरम्यान अजितदादांनी पुन्हा एकदा राजकारण हा आपला पिंड नाही ,ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला उभे राहिले आहेत. असे म्हणत कोल्हेना टोला लगावला आहे .
शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, विद्यमान हे डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. ही अशा प्रकारची डायलॉगबाजी मालिकेत, चित्रपटातच शोभून दिसतात. पण, ही डायलॉगबाजी जनतेसमोर कामी येत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.आढळराव-पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आणि कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना करावी. आढळरावांची ही घरवापसी आहे,तर तुमचे पक्षांतर झालेले आहे. मतदारांना उपलब्ध होणारा खासदार हवा आणि आढळराव हे लोकांसाठी उपलब्ध असतात, असे ते म्हणाले.
तसेच अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, त्यांचे कार्य घराघरात पोहचवले अशी साद घालतात आणि मते मागतात. पण, २०२२ मध्ये तुम्ही एका चित्रपटात नथुरामची भूमिका केली होती हेदेखील सांगा. फक्त सोयीची असलेली भूमिकांबद्दल का सांगता, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचा प्रचार करणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.