चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरपासून प्रचाराच्या सभेला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातून सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. लोकसभेच्या जागांच्या संख्येच्या बाबतीत, देशातील सर्वात मोठे राज्य – उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वात महत्वाचे राज्य मानले जाते. येथे पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान मोदी चंद्रपूरात सभा घेणार आहेत. यावरुन आता वार- पलटवार सुरु झालेत. चंद्रपुरात मोदींनी चार सभा घ्याव्यात तरीही धानोरकरच निवडणूक येणार असं संजय राऊत म्हणालेत. त्यावर मुनंगटीवारांनी उत्तर दिलंय. यावर मुनगंटीवारांनीही प्रत्युत्तर दिलं. राज्याची पहिली सभा वाघाच्या भूमीत होत असल्याचं विजय निश्चित असल्याचा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्ध स्तरावर यंत्रणा राबविली आहे.
चंद्रपूरात प्रतिभा धानोरकर विरूद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत
चंद्रपूरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात मविआमधून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. जागा वाटप होण्यापूर्वी सुधीन मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतर त्यांना रिंगणात उतरावं लागलं. दुसरीकडे. चंद्रपूरातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. या जागेवरुन विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार इच्छूक होती. विजय वडेट्टीवारही त्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात आलं.