नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधानांवर पलटवार केला आहे. बंगळुरूमध्ये रॅली दरम्यान प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘दोन दिवसांपासून म्हटलं जात आहे की, काँग्रेस तुमचं मंगळसूत्र, तुमचं सोनं हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ५५ वर्षांपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी कोणी कोणाचं सोनं, मंगळसूत्र हिसकावून घेतलं नाही. युद्धादरम्यान इंदिरा गांधी यांनी स्वत:कडील सोनं देशाला दिलं. माझ्या आईनं मंगळसूत्र या देशासाठी बलिदान केलं आहे. ते (भाजप) महिलांच्या संघर्षाला समजू शकत नाही.’
55 वर्षांत कोणाचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं का?
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, जर पंतप्रधानांना मंगळसूत्राचं महत्त्व माहिती असतं तर असं म्हटले नसते. ५५ वर्षात काँग्रेसने कोणाचं मंगळसूत्र किंवा सोनं हिसकावून घेतलं का? जेव्हा देश युद्धाशी लढत होता, इंदिरा गांधींनी आपले दागिने देशाला दिले. माझ्या आईचं मंगळसूत्र देशासाठी कुर्बान झालं. प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, जेव्हा माझ्या बहिणीला नोटबंदीमुळे आपलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं होतं, तेव्हा पंतप्रधान कुठे होते? जेव्हा कर्जाच्या दबावाखाली शेतकऱ्याच्या पत्नीला आपलं मंगळसूत्र विकालं लागतं तेव्हा पंतप्रधान कुठे होते. पंतप्रधानांनी मणिपूरमधील त्या महिलेबद्दल काहीच का बोलले नाही, त्या महिलेला निर्वस्त्र करीत रस्त्याने फिरवण्यात आलं होतं. महागाईमुळे आज कित्येकांचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागत आहे.
हे ही वाचा-पहिल्या टप्प्यात कमी मतदानानं भाजपा चिंतेत, प्रत्येक मतदारसंघात 10 टक्के मतदान वाढवण्याचे प्रयत्न
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
काँग्रेस आणि इंडिया गठबंधन यांचं लक्ष आता तुमच्या संपत्तीवर आहे. तुमच्या मंगळसूत्रावर आहे. दोन घरं असतील तर एक घर हिसकावून घेतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जाहीर सभेत म्हणाले होते.