मुंबई- महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचारासाठी अमित शाहा हे अमरावतीत येत असून, राहुल गांधी हे सोलापूर आणि अमरावतीत प्रचार करणार आहेत. राज्यात कोणत्या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होणार आहे हेही जाणून घेऊयात.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात कुठं मतदान
- बुलढाणा – शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आव्हान असणार आहे. तुपकर या मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आहेत. वंचितकडून वसंत मगर तर वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हेही मैदानात आहेत. या मतविभाजनात कुणाला फायदा होणार हे पाहावं लागणार आहे.
- अ्कोला – अकोल्यात प्रामुख्यानं भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.
यास,ह 15 उमेदवार रिंगणात आहेत. वंचितच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार हे पाहावं लागणार आहे. - अमरावती – अमरावतीत भाजपाकडून नाराजीनंतर आणि विरोधानंतरही पुन्हा नवनीत राणा यांना संधी देण्यात आलेली आहे. तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे हे रिंगणात आहेत. प्रहार जनशक्तीच्या वतीनं कट्टर शिवसैनिक असलेल्या दिनेश बूब यांना उमेदवारी दिलेली आहे. तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हेही रिंगणात असून त्यांना वंचितनं पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता या चौरंगी लढतीत कुणाच्या बाजूनं मतदान होणार हे पाहावं लागणार आहे.
- वर्धा – भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसचे आमदार अमर काळे या तरुण नेतृत्वाला संधी दिलेली आहे. वंचितकडून डॉ. राजेश साळुंखे आणि बसपाकडून मोहन राइकवार हे रिंगणात आहेत. यात रामदास तडस यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या, त्यांच्या स्नुषा पूजा तडस यांचाही समावेश आहे.
एकूण 24 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या दुरंगी लढतीत तडस यांच्यावर झालेल्या आरोपांचा काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. - यवतमाळ-वाशिम– महायुतीची उमेदवारी कुणाला, यामुळं गाजलेल्या या मतदारसंघात अखेरच्या क्षणी शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. या ठिकाणी वंचितचा उमेदवार रिंगणात नसला तरी बंजारा समाजाचे नेते माजी खासदार हरीभाऊ राठोड हे बसपाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. राजश्री पाटील यांच्या उमेदवारीचा काय परिणाम मतदारसंघात होतो, हे पाहावं लागणार आहे.
- हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेनं हेमंत पाटील पाटील यांची उमेदवारी बदलत बाबूराव कदम कोहळेकर यांना रिंगणात उतरवलंय. त्यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश आष्टीकर तर वंचितचे बी डी चव्हाण यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपा नेते शिवाजी जाधव यांनी केलेली बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडणार हेही पाहावं लागणार आहे.
- नांदेड – नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपावासी झाल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नांदेडमधून विद्यमान खासदार प्रताप पाील चिखलीकर यांच्याविरोधात कांग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर वंचितच्या वतीनं अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भोसीकर हे लिंगायत-वाणी समाजातील आहेत. वंचितचा उमेदवार याहीवेळी गेल्या वेळेप्रमाणे निकाल बदलणार का हे पाहावं लागणार आहे.
- परभणी – परभणीत शिट्टी या चिन्हावर महायुतीच्या वतीनं महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासादर संजय जाधव पुन्हा रिंगणात आहेत. वंचित आघाडीकडून पंजाब डख हे रिंगणात आहेत. या उमेदवारांसह ३१ उमेदवार रिंगणात असले तरी या तिरंगी लढतीत काय होणार हे पाहावं लागणार आहे.