वसंत मोरेंच्या मनधरणीमुळे मविआचे पितळ उघड
X: @therajkaran
मुंबई: पुण्यातील बहुचर्चित नेते वसंत मोरे यांनी गेले अनेक महिने अपेक्षित असलेला राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाच. मोरेच्या राजीनाम्याची डोळ्यात तेल घालून वाटच बघत असलेल्या काँग्रेस , शिउबाठा आणि शरद पवार गट या तिघांनीही त्यांना आमच्याच पक्षातून पुणे लोकसभा लढावी, असे आमंत्रण दिले आहे. मविआकडे सक्षम उमेदवार देण्याची पात्रता नाही हे या निमित्ताने समोर आले असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे.
पुण्यात राजकारणाचा कानोसा घेतला असता असे ऐकायला येते की, खरंतर मनसे लोकसभा लढवणार नाही आणि आपल्याला खासदार व्हायला मिळणार नाही हे मोरेंनी काही महिन्यांपूर्वीच ओळखले होते. कुठल्याही परिस्थितीत खासदार व्हायचेच, मग भले पक्ष कुठलाही असो, या मानसिकतेने सध्या मोरे यांना पछाडलेले आहे. अर्थात पुणेकरांची सेवा करायची आहे असा उदात्त हेतू त्यामागे आहेच.
पक्षांतर्गत विरोध, शहरातील पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, राज यांना दिली जाणारी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती, अशी विविध कारणे मोरे यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहेत. शहरातील पदाधिकारी आपल्यास डावलत असून मनमानी वागतात, आपल्याबद्दल आणि एकूणच संघटनेबद्दल चुकीचे चित्र राज ठाकरे यांच्यासमोर सातत्याने जाणीवपूर्वक उभे केले जात आहे, त्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार आणि टीका मोरे गेले काही दिवस करतच होते. तर मोरे हेच पक्ष संघटनेला गृहीत धरतात, सातत्याने दबावाचे राजकारण खेळतात अशी टीका त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत होते.
त्यातच पक्षातून बाहेर पडायला अमित ठाकरे यांनी मोरेच्या सोशल मीडियावरील पोस्टबाबत एकदा त्यांना समज दिली होती, राज ठाकरे आजपर्यंत आपल्याला कधीच काही बोलले नाहीत, मात्र अमित ठाकरे यांनी आपल्याला सुनावले हे निमित्त देखील मोरे यांना लोकसभा लढण्यासाठी मनसेमधून बाहेर पडून मोकळे होण्यास पुरेसे झाले. अर्थात मनसे सोडत असताना राज यांच्या फोटोला दंडवत घालून तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे राजकीय चातुर्य दाखवत सहानुभूती मिळवायला देखील चाणाक्ष आणि मुरब्बी वसंततात्या विसरलेले नाहीत.
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि मोरे यांची भेट झाली होती. मनसेवर दबावतंत्राचा भाग म्हणून या सर्व भेटीगाठी घेताना मीडियाला अलर्ट मोडवर ठेवायला तात्या कधीच विसरत नाहीत. भेटीनंतर मात्र राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असे साचेबद्ध उत्तर देखील त्यांनी मीडियाला दिले असले तरी हवापाण्याच्या गप्पा मारायला हे दोन्ही नेते नक्कीच भेटले नव्हते हे उघडच आहे. आजतर ज्येष्ठ नेते आणि २०१९ च्या लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार खुद्द मोहन जोशींनीच मोरे यांच्याकडे पायधूळ झाडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत पुणे लोकसभा लढवावी अशी खुली ऑफर त्यांना दिली आहे.
दुसरीकडे मनसेमधून साधा कार्यकर्ता जरी फुटला तर तो आपल्या गळाला कसा लागेल याकडे उद्धव ठाकरे गटाचे बारीक लक्ष असते, इथे तर वसंत मोरेसारखा मोहरा गेले वर्षे दीड वर्षे अस्वस्थ आहे आणि तो मनसेमधून बाहेर पडतोय हे लक्षात येताच उबाठा गटाने आपले जाळे आधीपासूनच मोरेंवर पसरून ठेवलेले होते. त्यामुळे, आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही याची जाणीव असलेले मविआमधील हे तीनही घटक पक्ष मोरेंना पुणे लोकसभेच्या मैदानात निवडणुकीच्या घोड्यावर बसवायला उत्सुक आहेत.
मात्र, पुणे लोकसभा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. यामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे छावणी हे चार मतदारसंघ भाजपकडे आहेत. कसबा पेठ हा मतदारसंघ देखील इतकी वर्षे भाजपकडेच होता, जो पोटनिवडणुकीत मविआकडे गेला आहे तर वडगावशेरी येथे राष्ट्रवादीचा आमदार आहे. या सर्व मतदारसंघांत मनसेची स्वतःची अशी ताकद आहेच, पण ही ताकद राज ठाकरे यांच्या करीष्म्याची आहे हे वसंत मोरे जरी विसरले असतील तरी महाविकास आघाडीने विसरून चालणार नाही. त्यामुळे मोरे जरी मविआमध्ये येऊन लोकसभेला उभे राहिले तरी ही लढाई वसंत मोर यांना आणि मविआला सोपी जाणार नाही हे निश्चित.