मुंबई
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून तीनच नावं जाहीर केल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
सध्या भाजपने महाराष्ट्रातील तीन नावांची घोषणा केली आहे. यात कालच पक्षप्रवेश झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणारे मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांच्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं. यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याही परिस्थितीत त्या चंद्रकांत पाटलांसोबत प्रचारात उपस्थित राहिल्या आणि नाराजी असतानाही पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्याचच बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेचं उमेदवारपद दिल्याचं म्हटलं जात आहे.
शिदें गटातील मिलिंद देवरा यांच्या प्रवेशानंतर ते लोकसभेत निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरूद्ध मिलिंद देवरा लढत पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र मिलिंद देवरा यांना राज्यसभेवरील उमेदवारी मिळाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.