मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवमान केल्याच्या प्रकरणावर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’ काढून भाजपा आणि अमित शाह यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले.
लातूरमध्ये माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नांदेडमध्ये काँग्रेसने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली.
![](https://therajkaran.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-24-at-8.27.11-PM-1024x683.jpeg)
चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे तसेच इतर प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अमरावतीमध्ये जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार आणि प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
अकोला महानगर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्हा काँग्रेसनेही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन केले. जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड. बाबासाहेब भोंडे, प्रा. संतोष आंबेकर आणि गणेशराव पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
पालघरमध्ये काँग्रेसने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’ काढून जोरदार निदर्शने केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने सुरु केलेले हे आंदोलन राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सुरूच राहणार आहे. जालना जिल्ह्यात शुक्रवारी आंदोलन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली.