X : @NalawadeAnant
मुंबई – शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत आहे. बुधवारी मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर दिले. खा. संजय राऊत यांनी एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले असल्याने महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तीला रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या कार्यकारी संपादकपदी ठेवू नये. त्यांना राज्यसभेच्या सदस्यपदी राहण्याचा अधिकारच नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही आ. शेलार यांनी केली.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असताना जी कामे केली, ती निकृष्टच दर्जाची आहेत. त्यांनी जाहीर केलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्प वेळेत पुर्ण होवू शकला नाही. महानगर पालिकेचे हजारो कोटी रुपये खर्च करुन पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ते उभी करु शकले नाहीत. गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ट दर्जाचीच कामे त्याला जबाबदार आहेत, असा आरोप करत जगविख्यात डॉ. अमरापूकर यांचा जो गटारात पडून मृत्यू झाला, त्याचे आधी पापक्षालन करा, असा खोचक सल्लाही शेलार यांनी दिला.