मुंबई :
‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी केलेले वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाला आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला कमी लेखणारे असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती. देशाच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या खलिस्तानी दहशतवादाविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली ती एक कठीण आणि अपरिहार्य मोहीम होती.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी हा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले, याची आठवण करून देत सपकाळ यांनी अशा ऐतिहासिक बलिदानांचा अवमान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार नसते तर देशाचे तुकडे पडले असते”
सपकाळ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचाही संदर्भ देत भाजपला प्रश्न विचारला. त्या काळातील सुरक्षा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सैन्यदलाची अब्दालीशी तुलना म्हणजे राष्ट्रीय अपमान”
भारतीय सैन्यदलाने देशाच्या एकतेसाठी राबविलेल्या मोहिमेची तुलना आक्रमक महंमद शाह अब्दालीशी करणे म्हणजे सैन्यदलाचा आणि देशाचा अपमान असल्याचे सपकाळ म्हणाले. अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दहशतवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण होण्याचा धोका असल्याचाही त्यांनी आरोप केला.
मोदी, शाह आणि फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी
गिरीष महाजन यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे की भाजपची अधिकृत भूमिका, याचा खुलासा भाजप नेतृत्वाने करावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजन यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. जर ते सहमत नसतील तर त्यांनी सार्वजनिकरीत्या या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कारवाईची मागणी
देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित विषयांवर बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगत सपकाळ यांनी गिरीष महाजन यांनी देशाची आणि भारतीय सैन्यदलाची माफी मागावी, तसेच भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचा पुनरुच्चार केला.
(टीप : या वृत्तातील आरोप आणि दावे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांवर आधारित आहेत. संबंधित मुद्द्यांवर गिरीष महाजन किंवा भाजपची प्रतिक्रिया मिळाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

