महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला

X:@ajaaysaroj

ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण चार जागा येतात, त्यापैकी दोन शिवसेना आणि दोन भाजप असा सन्मानजनक तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण, ठाणे शिवसेनेकडे तर भिवंडी, पालघर भाजपकडे अशा सर्वमान्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार, मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला असणाऱ्या भाजपच्या कट्टर विरोधामुळे ठाणे जिल्ह्यातील उमेदवार घोषित व्हायला वेळ लागत होता. भाजपच्या दोन याद्या जाहीर झाल्यानंतरही मुख्यमंत्री पुत्राचे नाव जाहीर होत नाही यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

त्याचप्रमाणे ठाणे व पालघर येथील जागांचाही घोळ मिटत नव्हता. अर्थात या घोळाला नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरच्या जागांचीही किनार आहेच. शेवटी महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेच्या कल्याण येथील उमेदवाराची घोषणा करायला लावून महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे असा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कल्याण ही लोकसभेची एकमेव जागा असेल, की ज्यातील उमेदवाराची घोषणा स्वपक्षीय नेत्यांनी न करता विरोध करणाऱ्या पक्षातीलच सर्वोच्च नेत्याने केली आहे. ही जागा स्वतः घोषित करून, अबकी बार चारसौ पार हे भाजपसाठी किती महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी प्रत्येक जागा किती निष्ठेने लढवायची आहे याचा थेट संदेश फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, संघ स्वयंसेवक यांच्यापासून ते हक्काच्या भाजप मतदारांना पण दिला आहे. या ठिकाणी उभा राहणारा उमेदवार हा जरी शिवसेनेचा असला तरी तो चारसौ पार करणाऱ्यांमधला एक असणार आहे, आणि हे भाजपच्या फायद्याचे गणित आहे याची जाणीवच फडणवीसांनी उमेदवारी घोषित करताना डॉ शिंदेंना विरोध करणाऱ्या सर्वांना करून दिली आहे. या मतदारसंघात उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली असे तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

केवळ अंबरनाथ येथे शिवसेनेचा आमदार आहे तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आणि मुंब्रा कळवा येथे शरद पवार गटाचा आमदार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा येथील भाजप मतदारांवर पगडा आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीणचा महापालिकेत समाविष्ट होणारा बहुतांश भाग आणि डोंबिवली मतदारसंघात संघाची स्वतःची एक ताकद आहे. ती ताकद काय आहे याचा व्यवस्थित अंदाज भाजपला आहे. संघ नाराजीचे परिणाम काय होतात ते कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या २०१० साली झालेल्या निवडणुकीत ब्राम्हण बहुल प्रभागांतून मनसेचे ज्या मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले तेव्हा भाजपने भोगले आहेत. त्या निवडणुकीत भाजपच्या पडलेल्या जागा या अवघ्या काही मतांनी पडल्या होत्या हे भाजप विसरलेला नाही. मागच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असताना डॉ शिंदे यांना तब्बल ५,५९,७२३ (६३%) मते मिळवली होती. तेव्हा एकसंघ शिवसेना युतीमध्ये होती. महाफुटीनंतर या मतदारसंघात बहुतांश पदाधिकारी, लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत, पण सामान्य मतदार जो शिवसेनेला मतदान करतो तो कितपत बरोबर आहे याची सुप्त भीती भाजप आणि शिंदे गट या दोघांना आहेच. त्यामुळे कुठलीही नाराजी महायुतीतील या दोन्ही पक्षांना परवडणारी नाही.

भाजपची ही नाराजी केवळ कल्याण मतदारसंघापर्यंतच मर्यादित नाही. कोकण आणि ठाणे (पालघरसह) इथे लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात. रायगड येथून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे तर भिवंडीमधून भाजपचे कपिल पाटील या दोन्ही विद्यमान खासदारांना तिकीट मिळाले आहे. जर रत्नागिरीची जागा शिवसेनेला सोडावी लागली तर कोकणात भाजपचा नामोनिशाण राहणार नाही अशी भावना भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची आहे. अर्थात भाजप ही जागा सोडण्याची शक्यता फारच धूसर आहे. आणि जर शिवसेनेने ही जागा सोडली तर शिवसेनेचा हक्काचा मतदार असणाऱ्या कोकण पट्टीतच शिवसेनेचं अस्तित्व संपून जाईल अशी धारणा शिवसैनिक आणि सेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे निर्णय झालेला असला तरी अजूनही या जागेची घोषणा होत नाहीये असे बोलले जाते.

तीच बाब ठाणे पालघर येथील मतदार संघाबाबत आहे. भिवंडी -कल्याणचा फैसला झालेला आहे, दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारच परत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. प्रश्न आहे तो उर्वरित दोन जागांचा. ठाण्यात उबाठा गटाचे राजन विचारे विद्यमान खासदार आहेत. ही जागा सिटिंग एम पी म्हणून आमचीच आहे असा दावा शिवसेनेचा आहे. पण या मतदारसंघात तीन आमदार भाजपचे आहेत, तर एक आमदार पूर्वाश्रमीच्या भाजपच्या आहेत , ज्या मनाने अजूनही भाजपच्या जवळ आहेत. स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात काही काळ आहेत. केवळ दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि हाच येथील कळीचा मुद्दा आहे.

या दोन आमदारांपैकी एक खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर दुसरे ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रताप सरनाईक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ केवळ शिवसेनेसाठीच नाही तर थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले तर ,स्वतःचा मतदारसंघ देखील भाजपकडून वाचवू शकले नाहीत अशी नामुष्की त्यांच्यावर ओढवू शकते. टीका करायला, त्याचे राजकिय भांडवल करायला उबाठा गटाला आयताच विषय मिळेल याची भीती शिंदे यांना आहे. शिवाय महाफुटीनंतर आपल्या बरोबर जे आमदार , खासदार, लोकप्रतिनिधी आले आहेत त्यांना उत्तर द्यावे लागेल ते वेगळेच. पण हा मतदारसंघ लढवायचा तर राजन विचारे यांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार कोण हा यक्षप्रश्न महायुती समोर आहे. त्यासाठी डॉ संजीव नाईक यांनी धनुष्यबाण निशाणीवर लढावे असा प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. मात्र याला स्थानिक आमदार आणि ज्येष्ठ नेते संजय केळकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

पालघर मतदारसंघांची कथाच वेगळी आहे. इथल्या मतदाराला सातत्याने भाजप आणि शिवसेना गृहीत धरून चालत आहेत. पक्षीय स्वार्थ यापुढे मतदारांच्या प्रति असणारी नीतिमत्ता या दोन्ही पक्षांनी खुंटीवर टांगून ठेवली आहे. हा मतदारसंघ परंपरेने भाजपचा आहे. २००९ मध्ये इथून भाजपचे चिंतामण वनगा लढले होते, तेव्हा त्यांचा निसटता पराभव झाला. २०१४ मध्ये चिंतामण वनगा हे तब्बल सव्वा दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले आणि २०१८ च्या पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला तिकीट नाकारून भाजपने बाहेरून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले. २०१९ साली जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. पक्षीय स्वार्थ बघत शिवसेनेने त्यांना आपल्याकडून उमेदवारी दिली, आणि गावित देखील स्वतःचा स्वार्थ बघत बेडूकउडी मारून शिवसेनेत गेले, व निवडून आले. आता परत २०२४ मध्ये ही जागा भाजपने मागितली आहे. ठाणे लोकसभेच्या बदल्यात शिवसेनेने देखील ही जागा सोडली आहे असे सांगितले जाते. फक्त आता मतदारांना गृहीत धरून पुन्हा बेडूकउडी फेम राजेंद्र गावीतच येथून मतदारांना गृहीत धरून भाजपचे उमेदवार असतील की एखादा नवीन चेहरा बघायला मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्या नंतर ठाणे, पालघर या मतदारसंघांबाबत मॅरेथॉन चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पालघरची परंपरागत भाजपचीच असणारी जागा भाजपसाठीच सोडून, ठाणे शिवसेनेने पदरात पाडून घ्यायचे व कल्याण, ठाणे शिवसेनेने तर भिवंडी, पालघर भाजपने लढवायची असा सर्वसंमत तोडगा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात