मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha)मतदारसंघातील उमदेवार जाहीर करण्यात आला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची घोषणा केली . आता या उमेदवारीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत( Sachin Sawant) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे . त्यांनी म्हटले की, महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे, हे निर्णयही भाजपा घेताना दिसते आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसांनी घोषित केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने चालते असा टोला लगावला आहे.
कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारी घोषित होण्याआधीच श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटवर याआधी सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप, आमची जी बृहद युती आहे, ती त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना पक्ष नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आलीये. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.