मुंबई – मराठी माणूस आणि मुंबई यावर अनेक वेळा चर्चा होते आणि या मुद्द्यावर राजकारणही होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी माणूस या मुद्द्यय़ावर मुंबई महापालिकेत सत्ताही मिळवली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या साथीनं याच अजेंड्यावर महायुती काम करताना दिसतेय. मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलून ती मराठी करण्यात येणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीला राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून आजच्या कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांचे लवकरच नामांतर होण्याची शक्यता आहे.
राहुल शेवाळेंची मागणी काय?
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. करी रोड रेल्वे स्थानकाला लालबाग तर मरीन लाईन्स स्थानकाला मुंबादेवी यांसह एकूण सात रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या सात रेल्वे स्थानकांना नवी कोणती नावं देण्यात यावीत, हेही शेवाळे यांनी सुचवलेलं आहे.
१. करी रोड – लालबाग
२. सँडहर्स्ट रोड – डोंगरी
३. मरीन लाईन्स – मुंबादेवी
४. चर्नी रोड – गिरगाव
५. कॉटन ग्रीन -काळाचौकी
६. डॉकयार्ड – माझगाव
७. किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ
आज मान्यता मिळणार?
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत या नामांतराचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या आठवडाभरात लागेल. अशा वेळेस ब्रिटीशकालीन स्थानकांची नावं बदलून ती मराठी करण्यात महायुतीनं रपुढाकार घेतला, असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसतोय. यापूर्वी एलफिस्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून त्याऐवजी प्रभादेवी असं नामकरण करण्यात आलेलं आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबई सेंट्र्ल या रेल्वे स्थानाकाचं नामांतर करुन जगन्नाथ नाना शंकरशेठ असं करण्यात यावं, अशी मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र त्यावरही अद्याप केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला नाही. आता यात आणखी सात ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांच्या नावांची भर पडलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मंजुरी तातडीनं मिळण्याची शक्यता आहे.