मुंबई – राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्रात दाखल झाली असून १७ मार्चचला या यात्रेचा समारोप मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. मात्र येत्या पाच ते सहा दिवसांत काँग्रेसला या यात्रेच्या काळातच मोठे धक्के बसतील, असं भाकित भाजपाचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी वर्तवलेलं आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यातून बरेच मोठे नेते येत्या काळात भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे.
पद्माकर वळवी आज भाजपामध्ये
राहुल गांधी यांची न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये दाखल झाली. त्याचवेळी नंदुरबारमधील काँग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी वळवी यांचा प्रवेस भाजपात होणार आहे. धुळे-नंदुरबारमध्ये यामुळे भाजपाची ताकद वाढणार असल्याचं सांगण्यात येतंय.
ठाकरेंचे दोन आमदारही शिंदेंच्या गळाला?
जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर, ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखी २ आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
वायकर यांच्यासारखअया निष्ठावंत आमदाराच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत आता संभ्रम निर्माण झाल्याचं मानण्यात येतंय. विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या तोंडावर मुंबईतील ठाकरेंचे दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र हा दावा फेटाळून लावलेला आहे.
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे किती आमदार?
सध्या मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडे आठ आमदार आहेत. त्यात आदित्य ठाकरे सोडल्यास सात आमदारांचा समावेश आहे. यात अजय चौधरी, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, प्रकाश फापर्तेकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आणि ऋतुजा लटके यांचा समावेस आहे.
काँग्रेसलाही धक्का बसण्याची शक्यता
मुंबईततील मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि मराठवाड्यातील अशोक चव्हाण हे काँग्रेसचे बडे नेते गेल्या काही काळात महायुतीत गेलेले आहेत. अशात मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही तर संजय निरुपमही भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून अमोल किर्तिकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. जागावाटपाआधीच झालेल्या या घोषणेवर निरुपम यांनी टीकाही केलीय. भाजपालाही या मतदारसंघात चांगला उमेदवार हवा आहे. अशा स्थितीत निरुपम भाजपात जाणार का, अशी चर्चा रंगतेय.
हेही वाचाःभाजपाची दुसरी यादी आज? महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटणार? दिल्लीतल्या बैठकीकडे नजरा