नवी दिल्ली – भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतरक दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्याशी जागावाटप नक्की झाल्यानंतर दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील बैठकीकडे लक्ष
भाजपाच्या सोमवारच्या बैठकीनंतर अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या तिढ्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीय. त्यानंतर आज किंवा उद्यात अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडेल. त्यानंतर जागावाटपाची अंतिम यादी जाहीर होईल असं सांगण्यात येतंय.
काय आहे फॉर्म्युला
भाजपा ३४ पेक्षा जास्त जागा लढवेल, असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. मात्र शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना कमी जागा दिल्यास, भाजपा मित्रपक्षांचा वापर करुन घेते, असा संदेश जाईल आणि मित्रपक्षांचीही अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे असलेल्या जागा, हा निकष असण्याची शक्यता आहे.
यात भाजपने गेल्या वेळी २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील बारामतीची जागा सोडल्यास २३ खासदार भाजपाकडे आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे १३ खासदार आहेत, त्यामुळे त्यांना १३ जागा मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांना ४ जागा मिळतील. यात बारामती, शिरुर, रायगड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.
साधारण या सगळ्यांची बेरीज केल्यास ४१ मतदारसंघांचं वाटप या प्रमाणे होईल. उर्व्रित सात जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येईल, असं सांगण्यात येतेय.
तर अजित पवार राष्ट्रवादीकडूनही आणखी एक दोन मतदारसंघांची मागणी होण्याची शक्यता आहे.
या सगळ्यात भाजपा ३० जागी, शिंदेंची शिवसेना १३ जागी आणि अजित पवार राष्ट्रवादी ५ जागांवर लढेल, या फॉर्म्युल्यावर एकमत होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
घटक पक्षांना विधानसभेत संधी
महायुतीत असलेले घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत फारसे स्थान मिळणार नाही. रिपाइं, रयत, जनसुराज्य, प्रहार जनशक्ती, रासपा यासारख्या पक्षांना विधानसभेत योग्य जागा सोडण्याचं आश्वासन भाजपाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
यातील अनेक पक्ष हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना तूर्तास जागा मिळणार नाही, हे सांगितल्यामुळं त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.
हेही वाचाःआज धुळ्यात राहुल गांधींचा रोड शो अन् सभा, मालेगावात नागरिकांशी साधणार संवाद