X: @therajkaran
मुंबई: मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray news) यांनी नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे असे मी मानतो. राष्ट्रवादीत फूट जरी पडली असली तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे आतून एकत्रच आहे, असा दावाच ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, नाट्यसंमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. पण कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. पण सर्व आले होते एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही सर्व आतून एकच आहेत. शरद पवार आणि अजितदादा आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची माती होते. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
आज शिक्षणाबरोबरच तरुणांपुढे नोकऱ्यांचा विषय आहे. आपल्या देशात बाहेरच्या राज्यातील लोकं पोसायची आणि आम्ही आंदोलनं करायची हेच सुरू आहे. इथल्या तरुणांना नोकऱ्या देणं या राज्याला सहज शक्य आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं राज्याला शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये, मराठी म्हणून एकत्र राहू नये, तो वेगवेगळा असावा. वेगवेगळ्या जातीत राहावं. त्यासाठीचं विष कालवायला नेते बसलेलेच आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण (Maratha reservation) हा काही एकट्या मराठ्याचा प्रश्न नाही तर प्रत्येक राज्यातील त्या – त्या समाजाचा विषय आहे. एका जातीचा विषय कोर्टात गेला तर प्रत्येक राज्यातील जाती कोर्टात जातील आणि देशभर आरक्षणाचा विषय पेटेल. जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टातून होऊ शकत नाही, त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन घ्यावं लागेल, पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत अधिवेशन होऊ शकत नाही, असेही त्यांनी बोलताना सांगितले.