मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी चारच महिन्यात राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत साताऱ्यातील मतदारांनी उदयनराजेंच्या भूमिकेला मान्यता न देता राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना पसंती दिली होती . आता मात्र शरद पवारांनी आपला हुकमी एक्का त्यांच्याविरोधात उभा केला आहे . त्यामुळे उदयनराजेंच्या समोर तगडं आव्हान उभं राहील आहे .तसेच सातारा हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार सातत्याने निवडून येत आहे . आता यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचाच हुकमी एक्का बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
दरम्यान शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी पवारांना साथ दिली. आधीच्या जावळी मतदारसंघातून ते निवडून यायचे. नंतर जावळी हा परिसर साताऱा शहराशी जोडला गेला आणि त्या ठिकाणी त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रराजेंनी निवडणूक लढवली. नंतर शशिकांत शिंदे यांना बाजूच्या कोरेगाव मतदारसंघातून ल़ढावं लागलं. त्या ठिकाणाहून शशिकांत शिंदे आमदार ही झाले . आता या मतदारसंघात सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी निवडणूक लढण्यास प्रकृती कारणास्तव नकार दिल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून जाहीर करण्यात येणार आहे.