नाशिक
आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अनेक मतदारसंघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. यात नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या दोन निवडणूका भाजप खासदार ठरलेला धुळे मतदारसंघात यंदा शिंदे गटाच्या उमेदवाराची वर्णी लागू शकते. पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि चर्चांनंतर अखेर काही मतदारसंघाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून शिंदे गटाचे दादा भुसे निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे ६,१०,२६८ मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्येही हा मतदारसंघ सुभाष भामरे म्हणजे भाजपच्याच हाती होता. आतापर्यंत भाजपकडे असलेला हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाऊ शकतो. या जागेवर शिंदे गटाचे दादा भूसे यांचे सुपूत्र अविष्कार भुसे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता दादा भुसेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
नाशिक लोकसभेत जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.