सुल्तानपूर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूरच्या न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आज जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी २५ हजारांचे दोन जातमुचलक भरले.
५ वर्षांपूर्वी कर्नाटकात अमित शहा यांच्यावर केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 2018 च्या कर्नाटक निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, प्रामाणिकपणाबद्दल बोलणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षावर खुनाचा आरोप आहे. यानंतर सुलतानपूरचे भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल यांच्याविरोधात 4 ऑगस्ट 2018 रोजी मानहानीचा खटला दाखल केला होता. अमित शहांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्यामुळे तक्रार केल्याचं मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
भारत जोडो न्याय यात्रा सोडून राहुल गांधी आज कोर्टात हजर राहिले. यासाठी ते अमेठीहून कारने सुलतानपूरला पोहोचले. याआधी त्यांचा विमानाने जाण्याचा प्लान होता परंतू अचानक गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. राहुल यांनी आता कारने अमेठीतील फुरसातगंजला परततील. यानंतर उत्तर प्रदेशातील पाच दिवसांच्या न्याय यात्रेला अमेठीहून सुरुवात करणार आहेत.
या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 499 नुसार खोट्या अफवा पसरवणे, टिप्पणी करणे किंवा एखाद्याची बदनामी करणे, कलम 500 अंतर्गत बदनामी करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.