मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून, युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे .
दरम्यान या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.मात्र यावर शिरसाट म्हणाले , राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास नक्कीच महायुतीला याचा फायदा होणार आहे. महायुतीची आणखी ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील . मात्र आजच्या बैठकीत कोणताही प्रस्ताव वगैरे आणलेला नाही. असे प्रस्तावाचे काम वरिष्ठ पातळीवर होतात. माझ्यासारख्या मार्फत एखादा प्रस्ताव जाईल याची कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या भेटीत फक्त चहा आणि जुन्या आठवणींवर गप्पा झाल्या असे शिरसाट यांनी सांगितले . राज ठाकरेंचे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे संबंध आहे. फार दिवसांची इच्छा होती राज ठाकरेंना भेटायची, त्यांच्यासोबत गप्पा मारायची, त्यामुळे यात कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाही. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. परंतु आता पुढे काय करायला पाहिजे, यांनी काय करायला हवे याबाबत चर्चा झाली नाही. .शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात जेव्हा सभा व्हायच्या, त्यावेळी राज ठाकरे आवर्जून बाळासाहेबांच्या सोबत असायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे मनभेद नसायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचाही आणि आमचाही कुठेही मनभेद नाही. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम आम्ही केलं असे शिरसाट म्हणाले.
सध्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील आहेत. तरीही युतीत मनसेला (MNS) सहभागी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु, मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसे लोकसभेसाठी उमेदवार देणार का? याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान राज ठाकरे यांचं सध्या सर्व लक्ष त्यांच्या मेळाव्यावर आहे. माझी जी काही तळमळ आहे, ती मी माझ्या मेळाव्यात काढेल. त्या मेळाव्यात मी बोललेच मात्र त्यानंतर मी निर्णय घेईल असे राज ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.