मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या शिंदे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा राग मावळला असण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवतारे यांच्याशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. या बैठकीत शिवतारे यांच्या आक्षेपावर चर्चा करुन त्यांची समजूत काढली असल्याचं सांगण्यात येतंय. आज शिवतारे पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शिवतारेंचं बंड झालं थंड?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. तर सुप्रिया सुळेही मतदारसंघात फिरताना दिसतायेत. अशात पवार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजय शिवतारे यांनी गेल्या १५ दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती. दोन्ही पवारांना पाडण्याची हीच संधी असल्याचं सांगत, त्यांनी पवार विरोधकांची मोट बांधण्याचाही प्रयत्न चालवला होता. शिवतारेंच्या एन्ट्रीमुळं बारामतीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता होती.
शिवतारेंची दोन वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न
शिवतारेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर दोन वेळा मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळी शिवतारेंची आक्रमक भूमिका काय होती. अखेरीस बुधवारी रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवतारेंची समजूत काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
हेही वाचाःनवनीत राणा भाजपात, बच्चू कडू नाराज, प्रहार जनशक्ती लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता