मुंबई- सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा सुटल्याचं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासी झालेल्या चर्चेनंतर या विषयावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा होता. मात्र नाशिकची शिंदेंच्या शिवसेनेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देऊन हा तिढा सोडवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
नाशिकमधून छगन भुजबळांना तिकीट?
नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंना पुन्हा संधी मिळेल का, याबाबत साशंकता होती. गोडसे सातत्यानं या मतदारसंघातून पुन्हा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन वेळा त्यांनी ठाणे आणि मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शनंही केलंय. मात्र त्यांच्याजागी शांतिगिरी महाराज यांच्या नावाची चर्चा शिंदेंच्या शिवसेनेत सुरु होती. तर भाजपाही या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येत होतं. मनसेनंही महायुतीत येण्याची चर्चा सुरु असताना, या जागेची मागमी केली होती.
साताऱ्याचा तिढा सोडवताना ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मागितल्याचं सांगण्यात येतंय. या जागेवरुन छगन भुजबळ यांना संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.
साताऱ्यात उदयनराजेंचं शक्तिप्रदर्शन
दिल्ली मोहीम यशस्वी करुन साताऱ्यात पोहचलेल्या उदयनराजेंनी साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. साताऱ्याची जागा आपणच लढणार आणि तेही कमळ चिन्हावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्यासमोर आता मविआ कोण उमेदवार देणार, याची उत्सुकता आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
सातारा आणि नाशिक मतदारसंघात भाजपा आणि अजित पवार यांच्यात अदलाबदल झाली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं कदाचित धुळ्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येण्याची चर्चा आहे. सध्या या जागेवरुन सुभाष भामरे यांना पुन्हा भाजपानं तिकिट दिलंय. मात्र त्यांच्या नावाला विरोध होतोय. अशात शरद पाटील किंवा अविष्कार भुसे यांच्यासह इतर पर्यायांची चाचपणी महायुती करत असल्याचं सांगण्यात येतंय.
धुळे शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यास तिन्ही पक्षांचं समाधान होण्याची शक्यता आहे.