मुंबई : महायुती असो की महाविकास आघाडी, लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघाचा तिढा सोडवणं सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नेत्यांकडून थेट पक्षालाच आव्हान दिलं जात आहे. हातगणंगले मतदारसंघातही महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून सदाभाऊ खोतदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोतांकडून करण्यात येत आहे. यासाठी ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
हातकणंगले हा मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेवरुन ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यांही नावाची चर्चा आहे. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी काल २७ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनाच पुन्हा संधी दिली जाईल असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही महायुती आपल्याला गृहीत धरत नसल्याचे सांगून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज महायुती आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल, २७ मार्च बुधवारी रात्री धैर्यशील माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलवून घेत चर्चा केल्याची समजते.
तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा द्यावा. मी महाविकास आघाडीत जाणार नाही, असं राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, एप्रिल २०२१ मध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतला. त्यामुळे पुन्हा आघाडीत जायचं असेल तर कार्यकारिणीची बैठक बोलवावी लागेल. शिवसेनेने उमेदवार न देता मला पाठिंबा द्यावा, या मागणीवर राजू शेट्टी ठाम आहेत.