मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse) भारतीय जनता पक्षामध्ये (Bharatiya Janata Party )घरवापसी करणार असल्याची माहीती समोर आली आहे .आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होणार आहे . मात्र त्यांच्या घरवापसीमुळे शरद पवारांना लोकसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे ..
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत होते याबाबत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण (Ajit Chavhan) यांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी ते दिल्लीमधील नेत्यांच्या गाठी भेटी घेत असल्याचा खुलासा केला होता .तसेच त्यांना भाजपामध्ये येण्यासाठी भाजपा त्यांच्या घरी बोलवायला गेली नव्हती. मात्र त्यांच्याकडून भाजपामध्ये येण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं होत . तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी मात्र त्यांच्या प्रवेशाला सातत्याने नकार दिला होता. मात्र आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची माहिती समोर आल्याने गिरीश महाजन काय करणार हे पाहावं लागणार आहे .