जळगाव
एका ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबीरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मतदारसंघात घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पाच सदस्यांच्या समितीचं गठण केलं आहे.
६ फेब्रुवारी रोजी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबवण्यात आला होता. या शिबिरात १०७ लोकांवर ही शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांचं मार्गदर्शन मिळाले होते. येथे नाशिकमधील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यातील डॉ. जयश्री पाटील व डॉ. संदीप कुमावत यांच्या मदतीने बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या.
या शिबिरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात अर्जही दाखल केला आहे. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडून समितीचं गठण करण्यात आलं असून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.