मुंबई
राज्य अभियंता संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांना एक आवाहन करणारं एक पत्र लिहिलं आहे. यात कंत्राटदारांना गावपातळीवर होणाऱ्या भाईगिरीच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक राजकीय मंडळी पैशांसाठी मारहाण करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार वाढण्याचं या पत्रकात दिलं आहे. यावर वेळीच कारवाई केली नाही तर फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील सर्व कामं बंद करण्यात येईल, असा इशारा राज्य अभियंता संघटनेकडून देण्यात आला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हे पत्रक सोशल मीडियावर शेअर केलं आहे आणि खोकेबाज महायुती सरकारमध्ये खोके वसुली स्पर्धा राबवत असल्याची राज्य सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीकडून ओरबाडून सत्ता घेणारे आता राज्यातील कंत्राटदारांकडून ओरबाडून वसूली करत आहे. निवडणुकीपूर्वी किती वसूली करावी आणि किती नाही अशी स्पर्धा महायुतीतील तीनही पक्षात सुरू असल्याची साक्ष देणारे राज्य अभियंता संघटनेचे हे पत्र आहे. कंत्राटी सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाही, हे महाराष्ट्राचे सत्य आहे. महायुतीतील गुंड आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वसूली मोहिमेने आणि भाईगिरीने त्रस्त कंत्राटदारांना राज्य सरकारकडे संरक्षण मागण्याची वेळ राज्यात पहिल्यांदाच आली आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे स्पष्ट आहे.
खोके सरकारच्या काळात आता कंत्राटदारांवर खोके देण्याची वेळ आली आहे. विकासकामांच्या माध्यमातून आपला विकास करण्याची, खंडणी मागण्याची ही नवीन प्रथा महायुतीने राज्यात आणली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे.