मुंबई- महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच, वंचित मविआत आहे की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. २६ मार्चपर्यंत मविआच्या प्रस्तावाची वाट पाहणार असून त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून दिलेल्या उमेदवारीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी वंचित ताकदीनिशी प्रयत्न करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या घोषणेनंतर शाहू छत्रपतींनीही प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेबाबत त्यांचे आभार मानले आहेत.
मविआचं सहकार्य नाही – आंबेडकर
महाविकास आघाडीनं सहकार्य केलं नसल्यानं जागावाटपाचा तिढा कायम राहिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. मविआतच अद्याप १५ जागांवर भांडणं सुरु आहेत. त्या जागांवरील भांडणे न संपल्यामुळं, त्यांचा अंतिम प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, असंही आंबेडकर म्हणालेले आहेत.
२६ मार्चचा अल्टिमेटम
मविआसोबत जाणार की नाही, यासाठी २६ मार्चपर्यंत त्यांच्याकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. जागावाटपाचा तिढा संपत नसल्यामुळं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आंबेडकरांनी पत्र पाठवलंय. त्यात राज्यातील कोणत्याही सात जागांवर काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी लिहिलंय. या पत्राचं उत्तर अद्याप आपल्याला मिळालेलं नाही, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.
वंचितची नेमकी जागांची मागणी किती?
संजय राऊत यांनी वंचितला चार जागा देण्यात आल्याचा प्रस्ताव असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी हा दावा खओडून काढलेला आहे. अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील अकोला ही जागा परत घ्या, असं मविआला सांगण्यात आलं होतं. त्यामुळं केवळ दोनच जागांचा प्रस्ताव दिला होता, असं आंबेडकरांचं म्हणणंय. मविआतील १५ जागांचं काय होणार, आणि त्यांचा प्रस्ताव २६ पर्यंत आल्यावर पुढं निर्णय होईल असं त्यांनी सांगितलंय.
हेही वाचाःस्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकीटं पाठवली थेट सोनिया आणि राहुल गांधींना? कुणी केलाय हा प्रताप?