मुंबई : लोकसभेच्या तोंडावर जात वैधता प्रमाणपत्राबाबत अडचणीत सापडलेल्या अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे .याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) त्यांच्या जात प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब झाला आहे.न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला आहे . याआधी मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यांना न्यायालयाने दोन लाख रुपयांचा आर्थिक दंडदेखील ठोठावला होता.या निर्णयानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र कोर्टाने त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती .दरम्यान आज कोर्टाने हायकोर्टाचा निकाल रद्द करत राणांना मोठा दिलासा दिला आहे.अमरावतीमध्ये राणा यांच्यासाठी महायुतीची सभा सुरू असतानाच हा निकाल आला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आजच अर्ज दाखल करणार आहेत.भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहिल्यादांच नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत .त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यातच मीच निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून केला जात आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघातून नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. जून २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्या निर्णयास आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने एकमताने निर्णय दिला. त्यात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.