नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघआतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. उमेदवारी दाखल करताना संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात राुल गांधी यांच्याकडे केवळ ५५ हजार रुपयांची कॅश असल्याची माहिती दिली आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचं उत्पन्न हे १ कोटी ०२ लाख ७८ हजार ६८० रुपये होतं अशी माहिती समोर आली आहे.
शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक
राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावे बँकेच्या खात्यांत २६.२५ लाख रुपये आहेत. तर शेअर बाजारात त्यांची गुंतवणूक ही ४ कोटी ३३ लाख रुपयांची आहे. तर म्युचअल फंडामध्ये राहुल गांधी यांनी ३.८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. तर गोल्ड बॉन्डमध्ये राहुल यांनी १५.२ लाखांची गुंतवणूक केलेली आहे. राहुल गांधी यांच्याकडे ४.२ लाखांचे दागिनेही असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे.
यासह पोस्टाची खाती, सेव्हिंग सर्टिफिकेट, विमा यात ६१.५२ लाखांची गुंतवणूक राहुल गांधी यांनी केलेली आहे.
एकूण किती संपत्ती
राहुल गांधी यांच्याकडे ९ कोटी २४ लाख ५९ हजार २६४ रुपयांची जंगम मालमत्ता तर ११ कोटी १४ लाख २ हजार ५९८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती ही २० कोटी ३८ लाख ६१ हजार ८६२ रुपये इतकी आहे. तर राहुल यांच्यावर ४९ लाख ७९ हजार १८४ रुपयांचं कर्जही आहे. २००४ साली पहिल्यांदा राहुल यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांची संपत्ती ही ५५ लाख होती.
हेही वाचाःअमोल किर्तीकर ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, प्रचारासोबत ईडी चौकशीचाही फेरा