वांगीशेतीत कोट्यवधींचे उत्पन्न घेणाऱ्या सुप्रिया कर्जबाजारी
X: @ajaaysaroj
सुप्रिया सुळे आणि कित्येक वर्षे कोट्यवधींचे उत्पन्न देणारी त्यांची वांगी शेती याच्या सुरस कथा देशभर प्रसिद्ध आहेत. मात्र आज त्याच सुप्रियाताईंवर तब्बल ५५ लाखांचे कर्ज असल्याच्या बातमीने पुरोगामी महाराष्ट्र हळहळला आहे. बरं ते कर्जही आपली प्रतिस्पर्धी, बाहेरच्या घरातून आलेली भावजय सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रियाताईंना घ्यावे लागले आहे, हे समजल्याने तर अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, घरातल्या लेकीवर बाहेरून आलेल्या सुनेकडून कर्ज घ्यायची वेळ घरातल्या लेकीचा अभिमान असणाऱ्या जाणत्या पुरुषांनी का येऊन दिली अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.
२००९ साली याच सुप्रिया सुळे यांनी १० एकरात वांगी शेती लावून ५२ कोटी तर २०१४ च्या निवडणुकीत त्याच दहा एकरात ११३ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतल्याचा चमत्कार अवघ्या देशाला दाखवला होता. संपूर्ण राज्यात शेतकरी आत्महत्या प्रश्न पेटला असताना सुप्रिया ताईंच्या शेतीच्या यशोगाथेला त्यांच्या समर्थकांनी आणि बहुतांश मीडियाने डोक्यावर घेतले होते. आज बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक नामांकन अर्ज भरताना सुप्रिया यांनी आपल्या डोक्यावर ५५ लाख रुपयांचे कर्ज आहे असे, घोषणापत्रात म्हंटल्याने अनेकांच्या भुवया वक्र झाल्या आहेत. या बारामती मतदारसंघात ज्यांच्या विरोधात त्या उभ्या आहेत, त्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांनी ३५ लाखाचे तर, सुनेत्रा यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडून २० लाखाचे कर्ज त्यांनी घेतले आहे. ज्या सुनेत्रा पवार यांना, सुप्रिया यांचे वडील , महाराष्ट्राचे तथाकथित जाणते राजे, सोयीस्कर पुरोगामीत्वाचे खंदे पुरस्कर्ते शरद पवार यांनी बाहेरची म्हणून जाहीरपणे हिणवले, त्याच सुनेत्रा यांच्याकडून आपण कर्ज घेतले आहे हे प्रतिज्ञापत्रात सुप्रिया यांना लिहून द्यावे लागले आहे. घरात एवढे जाणते पुरुष असताना बाहेरच्या बाईकडून आणि तिच्या मुलाकडून उसनवारी करायची वेळ लाडक्या बापाच्या लाडक्या लेकीवर का बरं आली असावी हा प्रश्न संवेदनशील महाराष्ट्रात त्यामुळे चर्चिला जात आहे.
याच प्रतिज्ञापत्रात सुप्रियाताईंनी आपली संपत्ती ३८ कोटी रुपये असून, पती सदानंद सुळे यांची संपत्ती एक अब्ज १४ कोटी असल्याचे म्हंटले आहे. २०२२/२३ या आर्थिक वर्षात सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न १,७८,९७,४६० असून, बँकेत त्यांच्या खात्यावर ११,८३,२९,१९५ इतकी रक्कम आहे. तर शेअर्समध्ये त्यांची १६,४४,२४,१४० रुपयांची गुंतवणूक असून, राष्ट्रीय बचत योजनेत त्यांनी ७,१३,५०० रुपये गुंतवले आहेत. एकूण १,०१,१६,०१८ रुपयांचे सोनं तर चार लाख त्रेपन्न हजार चारशे सेहचाळीस रुपयांच्या चांदीच्या व १,५६,०६,३२१ रुपये किंमतीच्या मौल्यवान हिऱ्याच्या वस्तू सुप्रिया सुळे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनीपैकी ५,४५,२४,३३६ रुपयांचे बाजारमूल्य असणारी शेत जमीन असून, बिगर शेत जमिनीचे बाजार मूल्य ९,१५,३१,२४८ इतके आहे. याच प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी ३,५०,८६,०८० रुपयांचे कर्ज दिले असल्याचे देखील नमूद केले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अनेक कुटुंबातील घरे फोडायचे राजकारण सुरू करण्याचे अपश्रेय ज्यांच्याकडे जाते, त्यांच्याच घरात आज सत्तेच्या लालसेने फुटीची बीज रोवली आहेत. घरातल्या लेकीसाठी बाहेरची म्हणून ज्या सुनेला हिणवले, त्याच सुनेकडून लेकीने कर्ज घेतले आहे हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देण्याची वेळ देखील याच सत्ताकरणातील निवडणुकीने आज आणली आहे. राजकारणात वर्चस्व मिळवण्याची नशा, सत्तेचा हव्यास कोणाला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवेल हे या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे.