मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभुमीवर आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे . दोनच दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा तडस (Pooja Tadas) यांच्यासोबत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती . यावेळी पूजा तडस यांच्या 17 महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत आणण्यात आलं होतं. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या गोष्टीवर आक्षेप घेतला असून सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा (Susieben Shah) यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही असे त्यात सांगण्यात आले आहे . दरम्यान ऐन लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे .
दरम्यान पूजा तडस यांनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला DNA टेस्ट करायला सांगितली. चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप पूजा तडस यांनी केले होते. दरम्यान पंतप्रधान मोदींची रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यामध्ये सभा होण्याची शक्यता आहे. यासभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे, नरेंद्र मोदींनी मला न्याय द्यावा, अशी विनंती पूजा यांनी केली होती. त्यानंतर या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) पुत्र पंकज तडस (Pankaj Tadas) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या. या कथित ऑडिओ क्लिप भास्कर इथापे आणि पूजा तडस यांच्या असल्याचा त्यांनी दावा केला. पत्नीच्या आरोपांनतर पंकज तडस यांनी आजची पत्रकार परिषद सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपचं खंडन करण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे .