मुंबई- सातारा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता अनेकांना होती. सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं, महायुतीच्या उदयनराजेंसमोर कुणाला उमेदवारी द्यायची याचा पेच होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव या मतदारसंघासाठी चर्चेत होतं. अखेरीस शरद पवारांकडून या जागी शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आलीय. शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात ही लढत होणार, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे.
शशिकांत शिंदे आव्हान पेलणार?
सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे असलेले शशिकांत शिंदे यांची माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळख आहे. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषदेवर आहेत. २००९ आणि २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी कोरेगावातून जिंकलेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क असलेले शशिकांत शिंदे हे या निवडणुकीत उदयनराजेंसमोर कसं आव्हान निर्माण करतील, याकडं सगळ्याचं लक्ष असेल. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीनं ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झालेलं आहे.
रावेरमधून श्रीराम पाटील यांना संधी
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपनं राष्ट्रवादीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पुन्हा संधी दिलीय. रक्षा खडसेंसमोर एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे उभे राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ही लढत खडसे विरुद्ध खडसे होणार नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलं होतं. त्यातच आता खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार आहेत. तर त्यांची कन्या रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार आहेत. अशात रावेरमधून शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना संधी दिलीय.
हेही वाचाःबाजारात तुरी… खडसेंच्या घरवापसीपूर्वीच दमानियांचा राज्पपालपदाला विरोध, थेट राष्ट्रपतींना लिहलं पत्र