भुजबळ- गोडसे पिछाडीवर
कोकाटे- बोरस्ते- ढिकले आघाडीवर
X: @ajaaysaroj
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील नाशिकचा तिढा काही केल्या सुटेना, एकही पक्ष मागे हटेना, अशी बिकट परिस्थिती जागावाटपात निर्माण झाली असतानाच महायुतीच्या नेत्यांनी इथे नवीन पवित्रा घेतला आहे. महायुतीने आता छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांच्या ऐवजी राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे आणि अजय बोरास्ते यांच्या नावाची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे.
हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध, छगन भुजबळांना मराठा मोर्चासह इतर संघटनांचा विरोध, जास्त आमदार आणि लोकप्रतिनिधी भाजपचे असल्याने या जागेवर असलेला भाजपचा रास्त दावा, विद्यमान खासदार असल्याने शिवसेनेच्या गोडसेंचा जागा सोडण्यास ठाम नकार, अशा चक्रव्यूहात अडकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अंतर्गत सर्व्हेच्या नावाखाली हेमंत गोडसे व छगन भुजबळ या दोघांनाही बॅकफूटवर ठेवून नाशिक लोकसभा मतदारसंघात तिसराच उमेदवार उतरवायची तयारी केली असल्याची चर्चा महायुतीमध्ये सुरू झाली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्यासह नाशिक मधील भाजपच्या सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींनी थेट फडणवीस यांची भेट घेऊन विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देऊ नये अशी स्पष्ट मागणी केली होती.
भाजप नेते दिनकर पाटील यांनी तर गोडसे निवडून येऊच शकत नाहीत असे जाहीरपणे सांगितले. तर आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खाजगी निवासस्थानी शक्तिप्रदर्शन करून दबावतंत्र वापरले. यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेसारख्या संघटनेत शिस्तीला हरताळ फासून दबावाने तिकीट पदरात पाडून घेता येते असा वाईट पायंडा पडण्याची भीती निर्माण झाली. या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेनेमधील अनेक नेत्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली. तिकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले नाव केंद्रातूनच सुचवले गेले आहे, आणि याला फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे असे सांगून भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांच्या इच्छुकांच्या फुग्यातील हवा गुल केली. महायुतीमधील नाशिकच्या जागावाटपाचा रबर इतका ताणला गेला की, शिंदे, फडणवीस व पवार या तिघांनी आता इथे तिसराच उमेदवार बघायला सुरुवात केली आहे अशी माहिती मिळत आहे.
ही जागा सध्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे यावर शिवसेनेचा हक्क आहे असे सेनेचे म्हणणे आहे. महायुतीच्या वाटपात जर ही जागा शिवसेना राखू शकली तर गोडसेंच्या बरोबरीने सेना आता अजय बोरास्ते यांच्या नावाचा विचार करत आहे. नाशिक महापालिकेत त्यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून काम केले आहे. शिवसेनेतील महाफुटीनंतर, शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने, बोरास्ते यांनी बारा नगरसेवकांसह उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. ते सध्या नाशिकचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसने जुनेजाणते नेते सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. कोकाटे येथून चारवेळा आमदार राहिले आहेत. तर २०१९ ला लोकसभेला ते हेमंत गोडसेंकडूनच अपक्ष म्हणून लढत असताना पराभूत झाले आहेत. सर्वपक्षीय अनुभव असलेले हे व्यक्तिमत्व आहे. हवंतर पक्ष बदलायचा पण सत्ता कायम आपल्याकडे ठेवायची यात ते माहीर आहेत. १९९९ व २००४ साली ते शिवसेनेचे आमदार होते. नारायण राणे यांनी शिवसेनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना जय महाराष्ट्र करून मोठे बंड केले होते, या बंडात कोकाटे यांनी राणे यांची साथसंगत करत सेना सोडली व काँग्रेसमधून २००९ साली आमदार म्हणून निवडून आले. तर २०१४ साली त्यांनी भाजपची कास धरली आणि आत्ता जे उबाठा गटाचे लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत त्या राजाभाऊ वाजे यांना पराभवाची धूळ चारत आमदार झाले. २०१९ मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, मग ते अपक्ष म्हणून लढले आणि विद्यमान खासदार गोडसे यांच्या कडून पराभूत झाले. पराभूत झाल्यावर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये उडी मारली पण आमदार म्हणून सत्ता परत आपल्याकडेच ठेवली. त्यांच्या कन्या सीमंतिनी देखील नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. असा शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा चारवेळा उड्या मारत सत्ताकारणाचा सर्वपक्षीय प्रवास कोकाटे यांनी पूर्ण केला आहे. त्यांचे नाव आता छगन भुजबळ यांच्या ऐवजी लोकसभेसाठी राष्ट्रवादी गोटात चर्चिले जात आहे.
भाजपमध्ये देखील उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र आणि नाशिक पूर्वचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ढिकले कुटुंबही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे कुटुंब. उत्तमराव स्वतः नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते , काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस होते, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नाशिक महानगरपालिका झाल्यावर ते इथे महापौर देखील होते. त्यानंतर १९९९ साली ते शिवसेनेच्या तिकिटावर नाशिक लोकसभेतून निवडून आले. नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि २००९ साली मनसेचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. तर आता त्यांचे सुपुत्र राहुल ढिकले हे नाशिक पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. ढिकले कुटुंबाला देखील अशीच काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि आता भाजप अशी सत्ताकारणाची सर्वपक्षीय परंपरा लाभली आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेचा गुंता महायुतीला सोडवायचा आहे. तिन्ही पक्षांच्या दाव्यांमुळे व एकमेकांवरील कुरघोड्यांमुळे हा तिढा वाढतच चालला आहे. त्यामुळे ढिकले, कोकाटे व बोरास्ते या नवीन नावांमधून तरी काही तोडगा निघतो की परत जुन्या नावांवरच गाडी येऊन थांबते हे लवकरच स्पष्ट होईल.