चंद्रपूर : काँग्रेस ही देशातील अनेक समस्यांचं मूळ असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचाराचा शुभारंभ केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा करत, मविआवर त्यांनी सडकून टीका केलीय. स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी निवडणूक असल्याचं मोदींनी सांगितलंय.
प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ चंद्रपुरात केला. ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी लढाई असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केलीय.
काँग्रेसमुळं देशात फाळणी, काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद अशा समस्या निर्माण झाल्याची टीका त्यांनी केलीय. काँग्रेसला कारल्याची उपमा देत त्यांनी मराठी म्हणीचा वापरही भाषणात केला. लांगूनचानासाठी दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना आश्रय दिलेल्या काँग्रेसनं राममंदिराला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
स्थिर सरकार गरजेचं असल्याचं सांगत महाराष्ट्राशिवाय कुणाला हे माहीत असेल, असा टोलाही मविआला लगावलाय. मविआनं महाराष्ट्रातील विकास कामांना विरोध केल्याची टीकाही मोदींनी केलीय.
उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा उल्लेख नकली असा करत, एकनाथ शिंदेंच्या कामाचं त्यांनी कौतुक केलंय. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत, घरोघरी जाऊन मोदींचा नमस्कार सांगण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
चंद्रपूर आणि गडचिरोलीचंही त्यांनी भाषणात विशेष कौतुक केलं.
चंद्रपुरात प्रचाराचा फुटलेला नारळ ही विजयाची नांदी असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलंय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र चंद्रपूरमुळे भाजपाला करता आला नव्हता. यावेळी प्रचाराची सुरुवात चंद्रपुरातून करत पंतप्रधान मोदी आणि महायुतीनं ४०० पारचा नारा दिलाय. हिंदुत्व, विकास आणि मविआवर टीकास्त्र ही प्रचाराची दिशाही मोदींच्या भाषणातून स्पष्ट झालीय.