मुंबई : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार असणारे विद्यमान खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाकाच लावला आहे . अशातच आता त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.. या क्लिपमधील शिव्या देणारा व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा नीलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होत आहे . मात्र, ही लढाई केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसून ही लढाई शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध विखे कुटुंब अशी झालीये. खरं तर विखे विरुद्ध पवार हा संघर्ष आजचा नाही तर अगदी सुजय विखेंचे आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब विखेंपासूनचा आहे.आता या धमकीप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार माजी उपसरपंच गणेश काने यांनी सुजय विखे पाटील हेच विजयी होतील असे एका मुलाखतीत म्हटले होते. यामुळे निलेश लंके समर्थक अन लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचे अध्यक्ष निवृत्ती गाडगे मात्र कमालीचे संतापलेत आणि त्यांनी याचबाबत जाब विचारण्यासाठी माजी उपसरपंचाला फोन केला. यात गाडगे यांनी सुजय विखे यांच्या विजयाचा अंदाज का वर्तवला असा जाब विचारला . तसेच माजी उपसरपंचाला शिव्या आणि धमक्या दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासाठी गाडगे यांनी शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे. तसेच विखे यांना गोळ्या घालण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या आहेत. यामुळे ही ऑडिओ क्लिप सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात वायरल होत आहे.
याबाबत विखे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राजकीय वर्तुळात या ऑडिओ क्लिपची मोठी चर्चा असून लवकरात लवकर धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विखे यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. विखे यांच्या समर्थकांनी याबाबत निवडणूक अधिकारी, पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान सुजय विखे यांनी देखील या धमकीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले , किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही. 4 जून 2024 ला समोरच्या उमेदवाराचं (निलेश लंके) डिपॉझिट जप्त होणार, हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे त्यांनी सांगितले . , ‘पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशदीत आयुष्य जगलं आहे. मात्र, आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी पुन्हा लोकसभेत जात आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे .