मुंबई : देशासह राज्यात लोकसभेसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असताना आता रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राजकारणातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे . गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही, २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची कामगिरी खालवत चालली आहे. त्यामुळे काँग्रेचा आढावा बघता येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना यश मिळाले नाही तर त्यांनी पक्षातून बाजूला व्हायला हवं, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. आता त्यांच्या या सल्ल्यावर काँग्रेस कडून काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .
मागील दहा वर्षे राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत.. २०१९ मधील पराभवानंतर त्यांनी आपण आता पक्षातून मागे होऊ. पक्षाची सूत्र दुसऱ्याकडे देऊ असे म्हटले होते . परंतु त्यांनी तसे केले नाही. मध्य प्रदेश, राजस्थानसारखे राज्य काँग्रेसने गमावले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे असले तरी गांधी परिवाराचे पक्षावर वर्चस्व आहे. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे पक्षाचे कामकाज पाहत नाही. यामुळे राहुल गांधी यांच्यावरच पक्षाची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्राही काढली होती. आता या निवडणुकीत ते अयशस्वी झाले तर मात्र त्यांनी नक्कीच पक्षांतून बाहेर पडावं असं त्यांनी म्हटले आहे .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . “वायनाड हे माझे घर आहे आणि वायनाडचे लोक माझे कुटुंब आहेत.”“त्यांच्याकडून (वायनाडच्या लोकांकडून) मी गेल्या पाच वर्षांत खूप काही शिकलो आहे आणि मला भरपूर प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. या सुंदर भूमीतून मी पुन्हा एकदा लोकसभेसाठी 2024 साठी उतरलो आहे याचा मला अभिमान आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते .